मुंबई - रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी (दि. 19) रात्री दरड कोसळली. या दुर्घटनेनंतर सर्व अडथळ्यांवर मात करीत मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच बचावलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा कार्यवाही करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
स्थानिक प्रशासनाकडून सकाळी अकराच्या सुमारास प्राप्त झालेली माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इरशाळवाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावर इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता नाही. मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागत आहे. या वाडीमध्ये 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. गेल्या 3 दिवसांत (दि. 17 जुलै ते 19 जुलै) 499 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री 10.30 ते 11.00 या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. या घटनेची 11.30 दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. रात्री 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षास माहिती मिळाली.
इर्शाळवाडी ही चौक मानिवली ग्राम पंचायतमधील डोंगरदरीत वसलेली लहानशी वाडी आहे. या ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. ही वस्ती तीव्र उतारावर असल्याने दैनंदिन दळणवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. दूरध्वनी/मोबाईलने संपर्क साधणे ही कठीण होत आहे. प्रामुख्याने ठाकर आदिवासी समाज या वाडीत राहतात. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी या ठिकाणी दरड कोसळणे, भूस्ख्लन होणे, अशा प्रकरच्या घटना घडलेल्या नाहीत.
इर्शाळवाडीत 48 कुटुंब (228 लोकसंख्या) वास्तव्यात होती. त्यापैकी 25 ते 28 कुटुंब बाधित झालेली आहेत. 228 पैकी 70 नागरिक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे व 21 जखमी असून त्यापैकी 17 लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले असून 6 लोकांना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी 10.15 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे. त्या भागातील माती, दगड व तीव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफ च्या देखरेखीखाली स्थानिक गिर्यारोहक तरुण आणि एनडीआरफ जवान व सिडकोने पाठविलेले मजूर यांच्यामार्फत कार्यवाही सुरू आहे.
बचाव कार्यासाठी बचाव पथक पुण्याहून रात्रीच एनडीआरएफ ची 2 पथके (60 जवान) पहाटे 4 वाजेपूर्वी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच श्वान पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे. घटनास्थळ हे अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहोचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरते नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे व तेथील संपर्क क्रमांक 8108195554 असा आहे.
पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप यशवंती ट्रेकर्स व निसर्ग ग्रुपचे नियमित ट्रेक करणारे व त्या परिसरातील भैागोलिक परिस्थितीचा अनुभव असणारे तरुण बचाव पथकात सहभागी झालेले आहेत.
हवाईदलाचे दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रूझ हवाईतळावर बचावासाठी तयार आहेत. तथापि, खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्रीय अधिकारी घटनास्थळावर जेसीबी सारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नसल्याने त्वरीत बचावकार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत अकुशल मजूर शोध व बचावासाठी आवश्यक साधन सामग्रीसह पाठविण्यात आले आहेत. अडकलेल्या लोकांना कमीतकमी वेळेत सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मुसळधार पाऊस व ढगाळ धुक्यासारखी स्थिती असल्याने शोध कार्यात अडथळे येत आहेत. पायथ्यापासून पायी चालत जाण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. तसेच डोंगर कपारीच्या उतारीची उंची व तीव्रता ही 30 अंशापेक्षा जास्त असल्याने व झाडीझुडपे असल्याने केवळ शारीरिक दृष्ट्या सक्षम असलेले तरुण डोंगरचढ करू शकतात, अशी स्थिती आहे.
पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, स्थानिक आमदार महेश बाल्डी हे सर्वजण घटनास्थळी तातडीने पोहोचले आहेत.
डोंगर पायथ्यापाशी असलेल्या तात्पुरत्या स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहून योग्य समन्वय ठेवून शोध व बचावकार्य प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने सूचना देत आहेत. तसेच, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांत अधिकारी व तहसीलदार हे सुध्दा विविध स्तरावर समन्वय स्थापित करून बचावकार्य सक्रियपणे करीत आहेत.
रुग्णवाहिका वैद्यकीय पथके घटनास्थळी पासून बेसलाईन पर्यंत पहाटेच पोहोचली आहेत. वैद्यकीय उपचार पथक चालत जाऊन घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळावरील तात्पुरते नियंत्रण कक्ष, तालुका व जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच मंत्रालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण कक्षाद्वारे आवश्यक त्या बाबीसाठी समन्वय व प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहे.
वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. राज्य नियंत्रण कक्ष सातत्याने स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहे. दोन ‘अर्थ मुव्हिंग मशीन’ तेथे एअरलिफ्ट करता येतात का, याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत.
घटनास्थळावरून ज्या काही सूचना येत आहेत. त्यावर मुंबईतून मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समनव्य करीत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही दूरध्वनीवरुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि केंद्र शासनाकडून जी काही मदत लागेल ते देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दिली आहे.
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. दुर्घटनास्थळी अत्यावश्यक अन्नधान्य व रॉकेल पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
ही माहिती तालुका व जिल्हा स्तरावरून कार्यरत अधिकाऱ्यांकडून दूरध्वनी व ईमेलद्वारे प्राप्त केली असून ही प्राथमिक स्वरुपाची आहे. शक्य तितक्या लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे हा प्राधान्याचा विषय आहे व तो प्रभावीपणे अंमल होईल याची दक्षता घेण्यात येत आहे. असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहास सांगितले.
No comments:
Post a Comment