मुंबई - मुंबई ठाणे कल्याण बदलापूर अंबरनाथ रायगड रत्नागिरी आदी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात रेल्वे रुळावर पावसाचं पाणी साचल्यानं मध्य आणि हर्बर लाईनवर लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथील शाळा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडू नये, तसंच सुरक्षित ठिकाणी रहावं, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे. मुंबईसह परिसरात खुप पाऊस झाल्यानं निर्माण झालेल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी एनडीआरएफ तसंच जिल्हा प्रशासनांना देखील निर्देश देण्यात आले आहेत. आपण सकाळपासूनच मुख्य सचिव तसंच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसंच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य सुरु करावं, अशा सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बाळ गेले वाहून -
अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी असताना काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक छोटं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई चालत होती. अचानक त्या काकाच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटले आणि वाहत्या पाण्यात वाहून गेले. या बाळाला शोधण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम -
मुंबईत, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल परिसरात काल (मंगळवारी) रात्रीपासून पाऊस पडत आहे. याचा मोठा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. पावसामुळे मुंबई लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळ बंद पडली होती. पनवेल ते बेलापूर दरम्यान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूक देखील बंद आहे. पावसाचे पाणी रुळावर आल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. सायंकाळनंतर ट्रेन आता उशिराने धावत आहेत. लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
उद्या शाळांना सुट्टी -
मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत शाळांना सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले आहे. उद्या मुंबई, ठाणे पालघर, रायगड येथील शाळा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा सतर्क आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment