मुंबई - रायगड इर्शाळवाडीवर दरड कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 लोक बेपत्ता आहेत. ही घटना ताजी असतानाच मुंबईमधील दरडीखाली राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील दरडी कोसळून (Mumbai Landslide) होणारी जीवित आणि वित्त हानी नवीन नाही. मागील 31 वर्षात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 310 लोकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक नागरिक जखमी झाले. या दरडीखाली मुंबईतील 22 हजार 483 कुटूंब राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी मागील 12 वर्षांपासून राज्य सरकारने उपाययोजना केलेली नाही, राज्य सरकार त्यासाठी गंभीर नाही असा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
मुंबईतील 36 पैकी 25 मतदारसंघात 257 ठिकाण डोंगराळ भाग धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, या भागातील 22,483 झोपड्यांपैकी 9657 झोपड्यांना प्राधान्याने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली. यात उर्वरित झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले होते. पावसाळयात भूस्खलनामुळे 327 ठिकाणाबाबत अनिल गलगली यांनी महाराष्ट्र सरकारला आधीच सतर्क केले होते.
वर्ष 1992 ते 2023 या दरम्यान दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 310 लोकांनी जीव गमावला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. 2010 मध्ये सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने शिफारस केली होती आणि त्यावर वेळीच कार्यवाही झाली असती तर डोंगराळ भागात राहणा-या नागरिकांच्या मृत्यूला रोखता आले असते. मंडळाचा अहवाल आणि अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यानंतर 1 सप्टेंबर 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. तथापि, त्यानंतर 12 वर्षे उलटून गेली आहेत परंतु नगरविकास विभाग अद्याप त्याची अंमलबजावणी करीत आहे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणताही अॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) तयार केलाच नाही, असे गलगली म्हणाले.
No comments:
Post a Comment