मुंबई - मरीन ड्राईव्हजवळील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कडक कारवाई करावी त्याचबरोबर भविष्यात अशा घटनांना पायबंद घालण्याकरिता दर महिन्याला मुंबईतील महिला वसतिगृहांचे सिक्युरिटी ऑडिट करावे अशी मागणी मागणी आमदार मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळाने केली. याबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ०६ जुन २०२३ रोजी मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्यावर अत्याचार करुन हत्या केली गेली आहे. त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या प्रकरणातील संशयित सुरक्षा रक्षक आरोपीने आत्महत्या केली असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. तरी भविष्यात अश्या दुर्दैवी घटना घडू नयेत याकरिता सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी चौधरी यांनी यावेळी केली.
मुंबई महामंत्री शशिबाला टाकसाळ, मुंबई महिला मोर्चा प्रभारी शलाका साळवी, माजी नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment