चेंबूरमधील 'त्या' घटनेचं गूढ उकललं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2023

चेंबूरमधील 'त्या' घटनेचं गूढ उकललं


मुंबई - चेंबूरच्या टिळकनगर परिसरात एप्रिल महिन्यात झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणात दोघांना अटक केली आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ केली म्हणून दोघांनी तरुणाची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी कापडी पिशवीत मृतदेह टाकून तो झाडाला टांगला होता. आरोपींना अटक केली मात्र मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

चेंबूरच्या रोड क्रमांक ६ वरील होली फॅमिली शाळेजवळ असलेल्या एका झाडावर टांगलेल्या कापडी पिशवीमध्ये मृतदेह १९ एप्रिलला सापडला होता. टिळकनगर पोलिसांनी आधी अपमृत्यू आणि नंतर हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. एप्रिल महिन्यापासून हा तपास सुरू होता. मात्र, मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश येत नव्हते. ओळख पटत नसल्याने पोलिसांनी आरोपी शोधण्यावर लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण करीत पोलिसांनी चेंबूर येथे वास्तव्यास असलेल्या गौतम बोराडे आणि अफजल शेख या दोघांना अटक केली.

पोलिसांनी गौतम आणि अफजल या दोघांची कसून चौकशी केली. १९ एप्रिलला या दोघांना एक तरुण दारूच्या नशेमध्ये शिवीगाळ करीत होता. संतापाच्या भरामध्ये दोघांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस पकडतील या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. यासाठी दोघांनी मोठी कापडी पिशवी आणली आणि यामध्ये हत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह टाकला आणि ती पिशवी झाडाला टांगली, अशी माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad