आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या समन्वयाने मुंबईतील यंत्रणा संयुक्त 'रेकी' करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 June 2023

आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या समन्वयाने मुंबईतील यंत्रणा संयुक्त 'रेकी' करणार


मुंबई - मुंबईतील दरडीप्रवण क्षेत्राचे तसेच मोडकळीस आलेल्या जीर्ण इमारतींच्या परिसरात एखाद्या अनुचित घटनेनंतर आपत्कालीन प्रसंगी मुंबईतील विविध  यंत्रणेच्या सज्जतेसाठीची रेकी आगामी आठवड्यात करण्यात येणार आहे. अतिशय आव्हानात्मक ठिकाणी मदतकार्य पोहचवण्यासाठी सुज्जतेची खात्री करणे हा रेकी करण्याचा उद्देश असणार आहे. एखाद्या घटनेआधीची विविध यंत्रणांच्या समन्वयाची चाचपणीची तयारी करणे हेदेखील या रेकीचे उद्दिष्ट आहे.

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांची पावसाळापूर्व तयारीची बैठक आज महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आले. त्यासोबच नागरिकांच्या मदतीसाठीचे नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील पावसाळ्याच्या काळातील विविध यंत्रणांच्या सज्जतेसाठीचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे मदतकार्य पोहोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला सोयीचे होईल, अशा सूचना सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींना यावेळी दिल्या. त्यासोबतच विविध यंत्रणांनी आपल्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन कार्यरत आहेत का ? याची खातरजमा करण्याचे आवाहन आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी केले.  

या बैठकीला महानगरपालिकेच्या विविध विभागांसह बेस्ट, एमएमआरडीए, भारतीय हवामान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, तटरक्षक दल, भारतीय नौदल, विमानतळ प्राधिकरण, अदाणी इलेक्ट्रिसिटी आदी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.  
 
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयातून चाचपणीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, भारतीय नौदल, मुंबई वाहतूक पोलीस यादेखील यंत्रणा या रेकीमध्ये सहभाग घेणार आहेत. चिंचोळ्या भागात मदतकार्य पोहोचवण्यासाठीची आव्हाने प्रामुख्याने काय आहेत, या बाबींची पडताळणी यानिमित्ताने करण्यात येईल. त्यामध्ये, मदत पोहोचवण्यासाठीचे मार्ग, मदतकार्यासाठी वाहनांचे मार्ग, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या यंत्रणेची सज्जता अशा बाबींची चाचपणी होईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १५ दरडप्रवण क्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी आगामी पावसाळ्याच्या कालावधीत धोका असू शकतो. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला अतिरिक्त दोन तुकड्या तैनात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. घाटकोपर आणि कुर्ला या ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात या अतिरिक्त तुकड्या सज्ज असणार आहेत. या दरडप्रवण क्षेत्रात मदतकार्य पोहचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबईतील जीर्ण आणि धोकादायक स्थितीतील इमारतींच्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य पोहोचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad