Mumbai News - आपला दवाखाना लाभार्थींची संख्या दहा लाखांवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2023

Mumbai News - आपला दवाखाना लाभार्थींची संख्या दहा लाखांवर


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत लाभार्थींची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरातील दवाखान्यात विविध आरोग्याच्या सेवा सुविधा घेणाऱ्या लाभार्थींची संख्या आता दहा लाखांवर पोहोचली आहे. या दवाखानाच्या संख्येत येत्या डिसेंबर अखेरीस आणखी १०० दवाखान्यांची भर पडणार आहे. सध्या या दवाखान्यांची संख्या १५९ इतकी आहे.  

हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. सुरूवातीच्या महिन्यांच्या तुलनेत सरासरी लाभार्थींच्या वाढीच्या संख्येने आता वेग घेतला आहे.

मुंबईतील आपला दवाखान्यांची वाढती संख्या ही नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. मुंबईत आणखी १०० दवाखान्यांची भर करून एकूण २५० पर्यंत संख्या गाठण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, मुंबईतील नागरिकांना आपल्या परिसरातच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचारांच्या सुविधेसाठी हिंदुह्दयसम्राट आपला दवाखाना हा एक चांगला पर्याय ठरत आहे. मुंबईतील नागरिकांना आजार आणि सहव्याधींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीचा आपला दवाखाना हा उत्तम पर्याय असल्याचेही त्या म्हणाल्या.  

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात आतापर्यंत १० लाख ४ हजार ९१२ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे, या पैकी पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ४०,५०३ रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल फिजिशियन,त्वचा रोग तज्ञांकडून अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला असून, विविध चाचण्याही केल्या आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाने येथे ९,६४,४०९ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार याचा लाभ घेतला आहे .

प्रति एक लाख लाभार्थींची महिन्यानुसार प्रगतिशील आकडेवारी :-
१ लाख - ५२  दवाखाने - २ महिने ७ दिवस दिनांक ३० नोव्हेंबर २०२२
२ लाख - ६४ दवाखाने -  १ महिना ७ दिवस दिनांक ७ जानेवारी २०२३
३ लाख - १०६ दवाखाने - २६ दिवस दिनांक ३ फेब्रुवारी २०२३
४ लाख - १०७ दवाखाने- १९ दिवस दिनांक २२ फेब्रुवारी २०२३
५ लाख - १०७ दवाखाने - १२ दिवस दिनांक ६ मार्च २०२३
६ लाख - १०७ दवाखाने - २१ दिवस दिनांक १ एप्रिल २०२३
७ लाख - १५१ दवाखाने- २१ दिवस दिनांक २२ एप्रिल २०२३
८ लाख - १५६ दवाखाने - १७ दिवस दिनांक १० मे २०२३
९ लाख - १५९  दवाखाने  - १६ दिवस दिनांक २६ मे २०२३
१० लाख - १५९ दवाखाने - १५ दिवस दिनांक १० जून २०२३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad