मुंबई - बाळासाहेबांनी आजन्म काँग्रेसच्या राजकारणाला विरोध केला, मात्र त्यांचे वारसदार म्हणवून घेणाऱ्या तुम्ही मात्र सत्तेसाठी काँग्रेससोबतच पाट मांडलात. दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या विचारांचा आणि कामाचा वारसा पुढे नेणाऱ्या भाजपसोबत आम्ही युती केली, तर आम्हाला गद्दार म्हणून हिणवता? खरे गद्दार तर तुम्हीच आहात, अशा परखड शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान केलं.
गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही काम करत इथपर्यंत आलो. तुम्ही फक्त सत्तेचं राजकारण केलं. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत आणि यापुढेही ताकदीने आमचे काम सुरू ठेवू, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मंत्रिमंडळातील अनेक सहकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर बरीच उलथापालथ झाली. त्यानंतर झालेल्या वर्धापन दिनाच्या या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री उत्तर देणार का, असा प्रश्नही उपस्थित होत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वच टीकेचा समाचार घेतला. आपल्याला एक दिवस पंतप्रधान करा, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करतो आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी करतो, असं बाळासाहेब अनेकदा म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बाळासाहेबांचं तेच स्वप्न पूर्ण केलं. आम्ही बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसोबतच युती केली आहे, असं शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
गेल्या वर्षभरातील घडामोडींचा आढावा ही त्यांनी आपल्या भाषणात घेतला. गेल्या वर्षी २० जूनला आपण सर्वांनी एका क्रांतीची सुरुवात केली. संपूर्ण जगाने आपल्या या उठावाची दखल घेतली आणि अखेर ३० जूनला आपली, म्हणजे शिवसेनेची अधिकृत सत्ता स्थापन झाली. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी मात्र शिवसेनेची 'प्रायव्हेट लिमिटेड पार्टी' केली होती. शिवसेना पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात होती. पण बाळासाहेबांनी याच कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांच्यात हिंदुत्त्वाचा विचार रुजवला आणि शिवसेना मोठी केली, हे उद्धव ठाकरे विसरले, असा शेलकी टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. आम्हाला आमच्या आधीच्या कामांवरून हिणवलं जातं, कोणाला रिक्षावाला म्हणतात, कोणाला कचरा म्हणतात. पण याच कचऱ्यातून ऊर्जाही निर्माण होते, याचा विसर तुम्हाला पडला, असं शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेतच प्रतिस्पर्धी निर्माण केले. कार्यकर्त्यांना मोठे केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही, याचा त्यांना विसर पडला. त्यांना स्वत:च्या नेतृत्त्वावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांना मास-लीडरही नको होता. एवढे जण पक्ष सोडून जात असताना खरं तर आत्मपरीक्षणाची गरज होती. पण ते न करता दुसऱ्यांना गद्दार म्हणून हिणवण्यात त्यांनी धन्यता मानली, असा रोखठोक आरोप शिंदे यांनी केला. 'पन्नास खोके, एकदम ओके' या आरोपांवरही त्यांनी मौन सोडत 'खोके खोके म्हणून आरोप करताना सगळए खोके कुठे गेले, हे भविष्यात जनतेसमोर येईल,' असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी मोदी-शहा यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या आहेत. पण एकदा ते कुठे आणि आपण कुठे, याचं आत्मभान ठाकरे यांना यायला हवं, असंही शिंदे म्हणाले. मोदी-शहांना मणीपुरला जाण्याचा सल्ला देणारे स्वत: मंत्रालयातही जात नव्हते, याचा विसर पडू देऊ नका, असा शालजोडीतला टोमणा त्यांनी हाणला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडताना तुमच्या गळ्यात पट्टा होता, पण दुसऱ्या दिवशीच तो पट्टा गायब झाला. ही डॉ. एकनाथ शिंदे यांची ताकद आहे, असंही त्यांनी बजावलं.
आमची युती अभेद्य! -
गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. पण या चर्चेला मुख्यमंत्री शिंदे यांनी छेद देत पुढील सर्व निवडणुका शिवसेना-भाजप युती म्हणूनच लढवणार असल्याचं सांगितलं. फडणवीस सरकार असताना महाराष्ट्र गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर होते. महाविकास आघाडी सरकार आल्यावर हा क्रमांक खाली गेला. आता आमचे सरकार आल्यावर पुन्हा प्रथम क्रमांक मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असं शिंदे म्हणाले.
संघटना मजबूत करणार
'शासन आपल्या घरी', 'गाव तिथे शाखा', 'घर तिथे शिवसैनिक' अशा अनेक मोहिमा राबवून संघटना मजबूत करणार आहोत, असं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं. सर्वसामान्यांच्या घरात सरकारच्या योजना पोचवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यांना फेसबुक शाखेच्या माध्यमातून आभासी दुनियेत राहु द्या, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. कोविड काळात घोटाळ्यांच्या माध्यमातून पैसे कमावले जात होते त्याचा हिशेब द्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. हे सरकार सर्वसामान्यांसाठी कार्यरत असून शिवसैनिकांनी सरकारचे काम लोकांपर्यंत पोचवून शिवसेनेला अधिक मजबूत करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
'रिक्षावाला मर्सिडीजवाल्यापेक्षाही' गतिमान -
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आपली संभावना रिक्षावाला अशी केली जाते. मात्र तुम्ही आमची हेटाळणी केली, तरी याच रिक्षाने तुमची मर्सिडिझ खड्ड्यात घातली, हे लक्षात ठेवा. ही सर्वसामान्यांची ताकद आहे. तुम्ही सरकार चालवण्याऐवजी गाडी चालवत होतात तर मी गाडीत फाईली क्लिअर करतो हा फरक आहे व त्याचे दृश्य परिणाम राज्याला दिसत आहेत. त्यांनी अडीच वर्षांत सीएम वैद्यकीय निधी केवळ दोन कोटी रुपये वाटले. आम्ही अवघ्या ११ महिन्यात ७५ कोटी वाटले. रिक्षावाल्याचं असलं, तरी मर्सिडिझवाल्याच्या सरकारपेक्षा हे सरकार गतिमान आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment