कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या करोना केंद्रांत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साठम यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावेळी या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांत केली होती. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी ‘कॅग’ने दर्शवली. त्यानुसार ‘कॅग’चे पथक पालिकेत दाखल झाले. यात महापालिकेतील करोना केंद्रे उभारण्यातील गैरव्यवहार, करोनाच्या नावाखाली वारेमाप खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देणे, दहीसर येथील जमीन खरेदी प्रकरण, रस्ते बांधणी अशा सुमारे १२ हजार २४ कोटी रुपये खर्चाच्या कामांचे ‘कॅग’च्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशीत उद्वव ठाकरेंच्या काळात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची सूचना देण्यात आली आहे. विशेष तपास पथक (एसआयटी)कडून चौकशी होईल आणि जे काही असेल ते समोर येईल. पण कोणतीही चौकशी सुडबुद्दीने, आकसापोटी किंवा राजकीय हेतूने केली जाणार नाही. चौकशीत पारदर्शकता असेल, असे देखील कायंदें यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमुळे उबाठा गटाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर हा मोर्चा असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर हा भीती मोर्चा आहे. जर तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. चौकशी लावल्यावर पोटात भीतीचा गोळा का आला, भ्रष्ट्राचाराचा मुद्दा असेल तर मागील इतिहास देखील तपासावा लागेल, असा हल्ला मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. महापालिकेच्या कामाची चौकशी लावली तर महापालिकेवर मोर्चा का काढावा लागतो याचा विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. कॅगचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करु नये, अशी तुमची इच्छा आहे का, असे त्यांनी विचारले. मुंबईकरांची दिशाभूल करु नका, असे त्या म्हणाल्या.
मुंबई महापालिकेच्या एफडी मोडल्याचा कांगावा उबाठा गटाकडून जाणिवपूर्वक केला जात आहे. जनतेला याच मुद्द्यात गुंतवून ठेवले जात आहे. एफडी वापरल्या तरी त्यामध्ये वाढ करुन ७७ हजार कोटी वरुन ८८ कोटी वर आणल्या. एफडीची शहराला सध्या गरज असताना वापरली नाही तर त्याचा लाभ नागरिकांना कसा मिळेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही हा निधी घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावे लागले. यापूर्वी शहरातील घाण पाणी तसेच समुद्रात थेट सोडले जात होते. स्वतःला पर्यावरणवादी समजणारे व किनारपट्टी स्वच्छ करण्याचा केवळ फोटोजेनिक इव्हेंट करण्यात मर्दुमकी समजणाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा टोला नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. मुंबईकरांना रस्ते चांगले हवेत सामान्य करदात्या नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी कॉंक्रिटीकरण केले त्यात चुकीचे काय आहे. मुंबई शहरातील बकालपणा घालवला जात आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रकल्प उभारले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक ठिकाणी सुरु केले. त्यामुळे केवळ एफडी मोडल्याचा कांगावा करुन मुंबईकरांची दिशाभूल करु नका असे कायंदे यांनी ठाकरेंना सुनावले. कोस्टल रोड देखील आता पू्र्णत्वास नेत आहोत. उबाठा गटाला मोठी गळती लागली आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांना का जाताय असे कधी विचारले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकार पारदर्शकपणे काम करेल व चौकशीत काही त्रुटी आढळल्यास मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवक्ता असताना मला कधीही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार नव्हता, आता मला मोकळेपणे स्वतंत्रपणे बोलता येत आहे. उबाठा गटाच्या चेहरा म्हणून फिरणारे आमच्या देवी देवताची खिल्ली उडवतात. वारकऱ्यांची निंदा करणारे, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवणारे, बाळासाहेबांची निंदा नालस्ती करणारे शिवसेनेचा चेहरा बनत आहेत याची खंत त्यांनी व्यक्त केली.
उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या बाबत बोलताना त्यांनी एक स्त्री आहेस मग दुसऱ्या स्त्री बाबत बोलताना जीभ कशी धजावते, असा प्रश्न विचारला. आमच्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्या गोधडीची छिद्रे समोर आणावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
उबाठा गटात नकली हिंदुत्वामुळे अस्वस्थता आहे. हिंदुत्वाचा डीएनए बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथील अनेक आमदारांना हे आवडत नाही त्यांचे विश्व प्रवक्ते आम्हाला कचरा म्हणतात, मग चौकशीला का घाबरता असे कायंदे म्हणाल्या.
ज्यांना हिंदू संबोधून घ्यायला आवडत नाही त्यांच्यासोबत कितीवेळ बसणार हा प्रश्न होता, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या टिपण्णीबाबत बोलताना, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे, असा टोला त्यांनी लगावला.
No comments:
Post a Comment