मुंबई - मुंबईकरांचा पैसा उधळला जातो आहे, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही. या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर १ जुलैला आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘काल शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा झाला. त्याआधी शिबिर झाले. आज ब-याच दिवसांनंतर नगरसेवकांची बैठक घेतली. पावसाप्रमाणे निवडणुका सुद्धा लांबणीवर जातायत. लोकांची कामं करायची कशी? असा प्रश्न पडतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकेकाळी मुंबई महापालिका साडेसहाशे कोटी रूपयांच्या तुटीत होती; पण गेल्या काही वर्षात आमच्या कारभारात मुंबई महापालिकेकडे ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी निर्माण झाल्या. आता मात्र वारेमाप पैसा उधळला जातोय त्यांना जाब विचारणारे कोणीच नाही. जेव्हा महापालिकेत जनतेचे प्रतिनिधी असतात तेव्हा प्रशासन प्रस्ताव पाठवते. त्यावर मंजुरी-नामंजुरी होते.
मुंबई महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष झाले तरी निवडणूक घेण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. जाब विचारणारे कोणीच नसल्याने प्रशासकाच्या माध्यमातून महापालिकेच्या पैशांची खुलेआम लूट सुरू आहे. रस्ते, खडी सगळ्या कामांत घोटाळा आहे. रस्ते, जी-२० च्या नावावर वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेच्या ठेवीतून आतापर्यंत या सरकारने ७ ते ८ हजार कोटी उधळले आहेत. या सगळ्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करतील. महाविकास आघाडीतील पक्षही जर यात सहभागी झाले तर त्यांचे स्वागतच असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महापालिकेतील भ्रष्टाचाराची विशेष समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच घेतला. याबाबत विचारता, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. भ्रष्टाचार होता मग ९२ हजार कोटींच्या ठेवी राहिल्या कशा? कॅगच्या अहवालातही काहीच नाही. कोरोना काळातही विदाऊट टेंडर कोणतीच गोष्ट झालेली नाही. पंतप्रधान मदत निधीवर जाब विचारणारे कोणी नाही. मपाच्या निधीत भ्रष्टाचार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
फडणवीस नावडाबाई ! -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींनी कोविडची लस तयार केली असे वक्तव्य केले. यावर मी टीका केली तर मला म्हणाले अर्धवटराव म्हणाले. मी अर्धवटराव असेल तर त्या दिल्लीश्वराच्या आवडाबाई आहेत का? आवडाबाई पण नाही, आता ते नावडाबाई झाले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होण्याबद्दल विचारले असता, जेव्हा आमची भाजपासोबत युती होती तेव्हा अडवाणीही जिन्नांच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाझ शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला पंतप्रधान मोदी गेले होते. औरंगजेबाच्या चेह-यावरून दंगली करणारे औरदंगाबाज आहेत. यांना दंगली करायच्या आहेत. समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहेच; पण त्यामुळे हिंदूंना काय त्रास होईल ते पण सांगा. त्या आधी काश्मिर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी कायदा लागू करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment