Mumbai News - मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2023

Mumbai News - मुंबईतील सहा चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक



मुंबई - मुंबई महानगरातील समुद्रकिनारी व चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी महापालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती केली जाते. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या अप्रिय घटना घडतात. अशा घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता करण्याच्या हेतूने मुंबईतील सहा चौपाट्यांच्या ठिकाणी १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत राहणार आहेत अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

मुंबईला सुमारे १४५ किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. हा समुद्र किनारा मुख्यत्वे कुलाबा येथे सुरू होऊन गोराई आणि तेथून पुढे मुंबई महानगर प्रदेशात पसरलेला आहे. नागरिक व पर्यटकांना समुद्रकिनारी पर्यटन किंवा फिरण्यासाठी मुंबईत सहा चौपाटी उपलब्ध आहेत. यापैकी गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करूनही बरेचदा नागरिक किंवा पर्यटक नियमभंग करतात. ११ जून २०२३ रोजी वर्सोवा, सांताक्रुझ (पूर्व) येथील ८ तरुण अशाचप्रकारे समुद्रात शिरले. दुर्दैवाने ते समुद्राच्या लाटेत ओढले गेले आणि त्यापैकी चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जीवरक्षकांनी मज्जाव केला तरीही त्यांचे लक्ष चुकवून या तरुणांनी समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सहाही समुद्र चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षा रक्षक नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

या सहा चौपाट्यांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि दुपारी ३ ते रात्री ११ वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक कार्यरत असतील. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी हे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक प्रयत्न करतील तसेच पाण्यात बुडण्याच्या घटनांपासून नागरिकांचा बचावही करतील असे शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad