मुंबई - कुर्ला खैरानी रोड येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून केले जाणार आहे. या कामासाठी या विभागातील पाणी पुरवठा १३, २०, २७ मे रोजी बंद राहणार आहे. याची नोंद घेवून नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने तसेच उकळून प्यावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उप जल अभियंता (परिरक्षण) खात्यातील पूर्व उपनगरातील `एल` वॉर्ड मधील खैरानी रोडवरील जमिनीखालील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे (असल्फा आऊटलेट) तुकाराम ब्रिज ते जंगलेश्वर महादेव मंदिर या दरम्यान पुनर्वसन व मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी सलग १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यापैकी ०७ दिवसांचे काम टप्पेनिहाय पद्धतीने पूर्ण झालेले आहे व उर्वरित कामासाठी सलग ३ दिवसांचा कालावधी लागणार आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हे काम दर शुक्रवारी दुपारी १:०० वाजल्यापासून रविवार पहाटे ०५:०० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यास्तव, दर शनिवारी म्हणजेच दिनांक १३ मे २०२३, दिनांक २० मे २०२३ व दिनांक २७ मे २०२३ रोजी `एल` वॉर्ड मधील खाली नमूद केलेल्या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. यासाठी या विभागातील नागरिकांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने व उकळून प्यावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या विभागात पाणी बंद -
‘एल पूर्व’ विभाग - संघर्ष नगर, लॉयलका कंपाउंड, सुभाष नगर, भानुषालीवाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णीवाडी, डिसुजा कंपाउंड, लक्ष्मी नारायण रोड, जोश नगर, आजाद मार्केट.
No comments:
Post a Comment