मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलासाठी तब्बल ११०० मेट्रिक टन वजन असणारा सुमारे १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी चमूने हे आव्हानात्मक लक्ष्य पूर्ण केले.
एन विभाग हद्दीत, घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानक रुळांच्या वरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या वतीने बांधण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीमध्ये रेल्वे रुळांवरून जाणारा सुमारे १०० मीटर अंतराचा मुख्य पूल समाविष्ट आहे. हा पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापन करावे लागणार आहेत. या गर्डरचे वैशिष्ट्य म्हणजे ते भारतातील रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद गर्डर आहेत. त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. या दोन खुल्या स्टील गर्डरची रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्यात येत आहे.
सदर गर्डरची कामे रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून लवकर पूर्ण करावीत, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी अलीकडे झालेल्या बैठकीत केली होती.
त्यानुसार, या दोनपैकी पहिला गर्डर काल शनिवार (दिनांक २७ मे २०२३) मध्यरात्रीनंतर १.२० वाजता ते आज (दिनांक २८ मे २०२३) पहाटे ४.२० (म्हणजे तीन तासांच्या कालावधीत) यशस्वीपणे स्थापन करण्यात आला आहे. गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ स्थानिक खासदार श्री. मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांच्यासह श्री. भालचंद्र शिरसाट, श्री. प्रवीण छेडा प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. एम. एम. पटेल, प्रमुख अभियंता (पूल) श्री. संजय कौंडण्यपुरे आणि मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पहिला गर्डर बसवण्यासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक मंजूर केला होता. त्या वेळेत गर्डर स्थापन करण्याचे काम विंच पुलिंग पद्धतीने (winch pulling method) पूर्ण करण्यात आले. प्रारंभी सदर गर्डर पूर्व बाजूकडून पश्चिम दिशेला सरकवत, रेल्वे रुळांच्यावर मधोमध आणण्यात आला. आता येत्या दोन-तीन दिवसात उत्तरेकडे सरकवून तो स्थित करण्यात येईल. तसेच, दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम देखील लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या गर्डरला मधोमध आधार न ठेवता अर्थात विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली जात आहे. एकूणच हा अभियांत्रिकी क्षेत्रातला अविष्कार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आजवर वेगवेगळे आव्हानात्मक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करून दाखवले आहेत. सदर गर्डरची यशस्वी स्थापना ही देखील महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी यशस्वी कामगिरीतील नवीन टप्पा ठरला आहे.
पहिल्या गर्डरनंतर दुसरा गर्डर स्थापनेचे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजूंकडील १७.५० मीटर रुंदीच्या पोहोच रस्त्यांचे (approach roads) काम करण्यात येईल. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन आहे.
रेल्वे उड्डाणपुलाबाबत संक्षिप्त माहिती -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग हद्दीत, पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणारा उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग (approach road) बांधण्यात येत आहे.
रेल्वे रुळांच्या वर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर राहणार आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथ देखील समाविष्ट आहेत. तर पोहोच मार्ग हा एकूण १७.५० मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी १ मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट असेल.
सदर उड्डाणपूल प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे. पैकी, रेल्वे रुळावरील मुख्य उड्डाणपुलाचा खर्च सुमारे १०० कोटी रुपये तर पोहोच मार्ग आणि इतर कामे मिळून ७८ कोटी रुपये इतका खर्च आहे.
या उड्डाण पुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर जाण्यासाठी जोडमार्ग देखील दिला जात आहे. त्यासोबतच दोन्ही बाजूचे रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय, जीना यांची देखील पुनर्बांधणी या प्रकल्पांतर्गत केली आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा मार्ग (service road) देखील समाविष्ट आहे. सेवा मार्गाच्या कामाचा भाग म्हणून पूर्व बाजूस सोमय्या नाला पुनर्बांधणी देखील करण्यात आली आहे.
उड्डाणपूल निर्मितीतील आव्हानांवर यशस्वी मात -
१) या पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. सन २०२२ मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाईन मध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला. त्याच बरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले.
२) दिनांक २ मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र, मध्यंतरी कोविड संसर्ग कालावधीतील निर्बंधांमुळे प्रकल्पाच्या निर्मितीत अडथळे आले.
३) त्याचप्रमाणे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम करीत असताना देखील अनेक आव्हाने समोर आली. पर्जन्य जलवाहिन्यांचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या तिकीट खिडकी कक्षांचे स्थानांतरण, प्रकल्पाच्या रेषेत आलेली अतिक्रमणे निष्कासित करणे, यांचा त्यात समावेश होता.
४) यासोबत, कामांच्या गरजेनुसार रेल्वे प्रशासनाची समन्वय साधून रेल्वे ब्लॉक घेणे, हेदेखील आव्हानात्मक ठरले आहे. ही सगळी आव्हाने पार करत हा प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाकडे सरकतो आहे.
No comments:
Post a Comment