मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी वॉर्ड’ मधील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या फेरीवाले, दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, पाणी पुरवठा, स्वच्छतागृहे तसेच गटारांची स्वच्छता, घरातील स्वच्छतागृहे आदी समस्या तातडीने सोडविल्या जाणार आहेत. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार आपल्या दारी आले असून रहिवाशांना आता यासाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, या शब्दात शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना आश्वस्त केले. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन रहिवाशांना आपल्या समस्यांचा पाठपुरावा मंत्री कार्यालयात देखील करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री केसरकर यांनी 'सरकार आपल्या दारी', 'जनतेशी सुसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मधील नागरिकांशी आज संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभारी जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, सर्व संबंधित विभागांचे शासकीय, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवाश्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
मुंबईला गत वैभव प्राप्त करून देणार -
मंत्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई अधिक चांगली व्हावी म्हणून कटाक्ष आहे. या अनुषंगाने मुंबईतील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबईतील तरूण शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्याचबरोबर महिला, बालक यांच्यासह सर्व नागरिकांना दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून मुंबईला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, मुंबई हे विविध वैशिष्ट्यांनी नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. येथे मंदिरे, चर्च, मशिदीही आहेत. येथील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, बाणगंगा आदी परिसरांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याचप्रमाणे कोळीवाड्यांचा विकास करून तेथे फूड प्लाझा उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देताना सार्वजनिक स्वच्छतागृहे नव्याने बांधण्यात येतील. मुंबईत अंमली पदार्थाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असल्याने विद्यार्थी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण थांबले असल्याचे सांगून या मोहिमेत पोलिसांसह शिक्षकांनीही सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले. मुंबईत महिला आणि तरूणांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणे यावरही शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड मध्ये अधिक प्रमाणात घाऊक व्यापार चालतो. यामुळे येथे वाहतुकीची समस्या असल्याने मुंबईत दोन मोठे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई करून पादचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
या सुसंवाद कार्यक्रमात १७६ रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री केसरकर यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment