मुंबई - मुंबई महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई संदर्भात मुंबईकरांना अभिप्राय, तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारीसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले. सलग दुसऱ्यादिवशी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतील पश्चिम उपनगरांतील नालेसफाईची पाहणी केली. चार तासांहून अधिक हा पाहणी दौरा सुरू होता. एके ठिकाणी मुख्यमंत्री स्वत: नाल्याच्या पात्रात उतरले आणि त्यांनी कामाची पाहणी करत सफाई कर्मचाऱ्याशी संवाद देखील साधला.
दरम्यान, अंधेरीतील गोखले पुलाचे कम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मिलन भूयारी मार्ग (सांताक्रुझ), गोखले पूल (अंधेरी पूर्व), ओशिवरा नदी (लिंक रोड, अंधेरी पश्चिम), पोयसर नदी, लिंक रोड (कांदिवली पश्चिम), दहिसर नदी (आनंदनगर पूल), दहिसर पूर्व व पश्चिम नदी पुनरुज्जीवन (बोरिवली पूर्व), श्रीकृष्ण नगरालगत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य (बोरिवली पूर्व) येथे पाहणी केली. यानंतर बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, यावर्षी पाणी साचणार नाही अशी अपेक्षा आपण करू. महापालिका प्रशासनाने त्याची खबरदारी घेतली आहे.त्याचा परिणाम दिसेल, ३१ मे पर्यंत चांगले काम पाहायला मिळेल.
नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर अभिप्राय नोंदवता यावा त्याचबरोबर नालेसफाईबाबत तक्रार असेल तर नागरिकांनी १ ते १० जून दरम्यान त्याची छायाचित्रे महापालिकेला पाठवावी. नालेसफाईमध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच संबंधित कामी हलगर्जी केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.
रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत. आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लड गेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी साधला नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी नाल्याच्या बाजूला गाळ काढून ठेवलेले त्याना दिसले त्यामुळे त्यांनी स्वतः नाल्यात उतरून नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तसेच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले तसेच त्याला या कामाबद्दल शाबासकी दिली.
गोखले पुलाचे काम दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे -
अंधेरी येथील गोखले पुलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यासोबतच या पुलाखाली मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी गोखले पुलाचे काम येत्या दिवाळीपर्यंत जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले. तसेच हा पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधकांशी संवाद साधला.
नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या -
मुख्यमंत्री शिंदे यांनी दरवर्षी पाणी साचत असलेल्या पोईसर नदीची पाहणी केली. दरवर्षी या नदीपात्रात पाणी साचल्याने आजूबाजूचा परिसर जलमय होतो. काठावरील नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो त्यामुळे या नदीपात्रातील गाळ देखील उपसून पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रटीकरणाला सुरूवात झाली असून सध्या ४५० कीमी रस्त्यांचे काम सुरू झाले आहे तर ४०० कीमी रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामाला गती मिळाली असून समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात येतील. आरोग्याच्या सोयीसाठी मुंबईत १७० आपला दवाखाना सुरू झाले असून मुंबईत २५० आपला दवाखाना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्याचे पर्यटन, महिला आणि बाल कल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, आमदार मनीषा चौधरी, आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम, प्रकाश सुर्वे मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment