मुंबई - मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान व्यक्त करावे अशी स्थिती नाही, किती खोल सफाई झाली त्या खोलीची आकडेवारी पालिकेने जाहीर करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या दिवशी पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, मनिषा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, श्रीकला पिल्लई, संदिप पटेल, कमलेश यादव, प्रियांका मोरे, प्रतिभा गिरकर, लिना देहरकर, शेजल देसाई, अंजली खेडकर, प्रवीण शहा, जगदिश ओझा, जितेंद्र पटेल, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, आदी उपस्थितीत होते.
आज प्रथम ओशिवरा नदी आणि भगतसिंग नाल्याची पाहणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरु होते. समुद्राला भरती असल्याने पाणी भरलेले असले तरी जेसीबीच्या सहाय्याने खालून गाळ निघत असल्याचे चित्र दिसत होते. तर वळनाई नाल्यात तर गाळाचे ढिगारे आज अखेर कायम असून आज दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे याबाबत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना जाब विचारण्यात आला.
तर भिम नगर नाल्याती सफाई करण्यात आली असली तरी नाल्याच्या काठावर अनधिकृत बांधकामे असल्याने या नाल्याची रुंदी कमी झाली आहे. तर दहिसर नदीच्या सफाईचे काम अद्याप सुरु असून बराच गाळ नदीत बाकी आहे. त्यामुळे याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की, महापालिकेने गाळाच्या वजनाची जशी आकडेवारी जाहीर केलेय तशी किती खोल गाळ काढला याची आकडेवारी जाहीर करावी तरच कळेल किती सफाई झाली. अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment