मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे अतिक्रमण निष्कासन मोहिमेला वेग आला असून एमआरटीपी अॅक्ट १९७६ नुसार अतिक्रमण निष्कासन कामावर अधिक सतर्कतेने नियंत्रण राखणे व नियमानुसार कामकाज होत असल्याबाबत खात्रीसाठी विशेष भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या निर्देशानुसार गठित या भरारी पथकाचे प्रमुख मंडळाचे उपजिल्हाधिकारी तथा अतिक्रमण निष्कासन विभागाचे प्रमुख संदीप कळंबे आहेत. मंडळाचे उपमुख्य अधिकारी पूर्व व उपमुख्य अधिकारी पश्चिम हे पथक उपप्रमुख आहेत. पथकात मंडळाच्या वांद्रे, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला, शहर या विभागांनिहाय प्रत्येकी एक कनिष्ठ अभियंता व सहाय्यक, वरिष्ठ लिपिक यांची नियुक्ती केली आहे. वांद्रे पूर्व येथील अतिक्रमण निर्मूलन मुख्यालयातही एक कनिष्ठ अभियंता व सहाय्यक नियुक्ती करण्यात आले आहेत.
सदर भरारी पथकाला सूचित प्रकरणांत स्थळ पाहणी करून जागेवरील दिसत्या परिस्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल, हस्तनकाशा, छायाचित्रे यांसह संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडील मूळ दस्तऐवज तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल अतिक्रमण निष्कासन विभाग प्रमुख कार्यालयास ७ दिवसात सादर करायचा आहे. म्हाडाच्या बहुमूल्य जमिनी रिक्त करून घेणे, अटी शर्तींच्याबाबत पूर्वस्थिती आणण्याच्या आदेशित झालेली दंडाची रक्कम मुंबई मंडळाच्या लेखाशाखेत अदा होत असल्याची खात्री सदर पथक करणार आहे. कायद्याप्रमाणे रितसर नोटीस, आदेश, खर्चाची वसुली, मुदतीत बजावणी होत असल्याची खात्री पथक करेल. भरारी पथकाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रकरणाची गोपनीयरित्या चौकशी करून माहिती विभागप्रमुखांकडे सादर करायची आहे. भरारी पथकाला विनापरवाना नवीन वाढीव बांधकाम तसेच म्हाडा ऍक्ट कलम ६६ (अ) (ब) मधील तरतुदीचा भंग होत असल्याचे आढळल्यास तसा अहवाल विभाग प्रमुखांना द्यावा लागणार आहे.
No comments:
Post a Comment