मुंबईतील सर्वाधिक ब्लॅकस्पॉट होणार सुरक्षित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2023

मुंबईतील सर्वाधिक ब्लॅकस्पॉट होणार सुरक्षित


मुंबई - मुंबईतील वाहतूक चौक (ट्रॅफिक जंक्शन) सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित असावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी या जागतिक उपक्रमातील भागीदारांच्या सहकार्याने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून मुंबई महानगरातील सर्वाधिक अपघाताची ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) सुरक्षित केली जाणार आहेत. अशा २० वाहतूक चौकांचा नवीन आराखडा तयार करुन त्यांचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईतील सर्वाधिक अपघात होत असलेली ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर अपघात प्रवण वाहतूक चौकांची पुनर्रचना केली जात आहे. यामध्ये वाहतूक चौक सुरक्षित बनवताना, विशेषत: ज्यांना रस्ते अपघातांचा अधिक धोका संभवतो असे पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी वाहतूक चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेला ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांकडून तांत्रिक सहाय्य लाभणार आहे. या भागीदारांमध्ये ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांचा समावेश आहे. याबाबतची प्रादेशिक बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी महानगरपालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले , प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीषकुमार पटेल यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर तज्ज्ञ, परदेशातून आलेल्या मान्यवरांनी मुंबईतील ५ जंक्शन्सला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. महानगरपालिकेने ब्लॅक स्पॉट ठिकाणी केलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.

मुंबई महानगरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत या २० अपघात प्रवण चौकांच्या ठिकाणी अधिक अपघात होवून पर्यायाने अधिक मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे. त्यामुळे या चौकांचा कायापालट करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या सर्व ठिकाणी अपघातांची संख्या कमी व्हावी, पर्यायाने नागरिकांचा वावर सुरक्षित व्हावा, या दृष्टिकोनातून सदर सर्व ठिकाणी चौकांच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेचे अभियंते हे ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी मधील भागीदारांसोबत कामकाज करत आहेत, असे उपायुक्त उल्हास महाले यांनी सांगितले.

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना -
वाहतूक चौकांमधील अपघात, मृत्यू आणि गंभीर दुखापतींची संख्या कमी करुन एकूणच वाहतूक चौक परिसरात सुरक्षितपणे वावरताना पादचा-याना ओलांडण्यासाठी मार्गिकेचे व पदपथाचे रुंदीकरण करणे, रस्ता ओलांडण्याचे अंतर कमी करण्यासाठी नवीन आश्रय स्थाने निर्माण करणे, वाहतुकीचा वेग मर्यादीत ठेवण्यासाठी गतिरोधक व पट्ट्या यांच्यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे, यांचा समावेश असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad