मुंबई - एस आर ए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये शासनाला सकारात्मक सूचना मिळाव्यात आणि येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढता यावा यासाठी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर, अस्लम शेख यांनी सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या पात्रतेबाबत परिशिष्ट दोन मधील यादी सात दिवसांच्या आत संकेतस्थळावर देण्यात येते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत झोपडपट्टी मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आधार पडताळणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, त्यामुळे अपात्र लोक यात येणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
झोपडपट्टी पुनर्विकास तसेच पुनर्वसनाबाबत प्रधानमंत्री यांच्या सल्लागार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सुद्धा सक्तवसुली संचालनालयाकडून पुनर्वसन प्रकल्पांबाबत परवानगी मिळण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने विनंती करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शांती डेव्हलपर्स आणि सर्वधर्मीय सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे पुनर्वसन होत असलेल्या सहा हजार धारकांना घर भाडे मिळवून देणार असून म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातही स्वयंपुनर्विकास पथदर्शी स्तरावर प्रकल्प करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
No comments:
Post a Comment