मुंबई - महात्मा फुले, सावित्रीमाई फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देऊन स्त्रियांना स्वातंत्र्य समतेचा अधिकार दिला. त्यामुळे भारतीय स्त्रिया आता सर्वच क्षेत्रांत प्रगती करीत आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रात पुढे आलेल्या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांना विधानसभा आणि लोकसभेत एक तृतीयांश राजकीय आरक्षण देण्यात यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
भीम छाया सांस्कृतिक केंद्र येथे रिपाइं मुंबई प्रदेश महिला आघाडीद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून महिलांना समतेचा शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांना आता स्थानिक साराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळते. मात्र महिलांना विधानसभा आणि लोकसभेच्या जागांमध्ये 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे असे आठवले म्हणाले.
यावेळी विचारमंचावर रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमाताई आठवले, रिपाइं महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामळू, ऍड.आशाताई लांडगे, शिलाताई गांगुर्डे, दैनिक सम्राटच्या संपादिका कांबळे, प्रियाताई खरे, रमाईची भूमिका साकारणाऱ्या प्रियांका उबाळे, अरुही निकाळजे, माजी नगरसेविका फुलाबाई सोनवणे, ऍड. अभया सोनवणे, आदी अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment