नवी दिल्ली - केंद्र सरकारने नागरिकांना माफक दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेड आणि एनएफसीसीच्या मार्फत 29.50 रुपये प्रतिकिलो दराने हे पीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. आज (सोमवार 6 फेब्रुवारी) पासून या पीठाची विक्री सुरू होणार आहे. ‘भारत आटा’ नावाने या पिठाची विक्री होणार आहे. (Government Will provide wheat flour)
केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांची या संदर्भात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या प्रगतीचा आढावा घेत हा निर्णय घेण्यात आला. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आला असून विविध दुकानांमध्ये केंद्र सरकारचे हे पीठ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय), केंद्रीय भांडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनएफसीसी) या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला.
या सर्व संस्था भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) डेपोतून 3 लाख टनापर्यंत गव्हाची उचल करतील आणि त्याचे पिठात रुपांतर केल्यानंतर हे पीठ देशातील विविध किरकोळ विक्रीची दुकाने, फिरत्या विक्री वाहनांच्या माध्यमातून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाईल अशी माहिती केंद्रीय अन्न तसेच सार्वजनिक वितरण विभाग सचिवांनी दिली.
या सर्व संस्थांनी ग्राहकांना ‘भारत आटा’ किंवा इतर नावाने ठळक अक्षरात कमाल किरकोळ किंमत 29.50 रुपये प्रतिकिलो असा उल्लेख असलेले गव्हाचे पीठ विकण्याचे मान्य केले. गव्हाच्या पिठाची विक्री करण्याबाबत संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या शिफारसीनुसार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे कोणतेही महामंडळ/सहकारी संस्था/महासंघ/स्वयंसहाय्यता गट यांना देखील केंद्र सरकारकडून गव्हाचे वितरण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment