रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीत घेतली शपथ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 February 2023

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीत घेतली शपथ


मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी बैस यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान सभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय -
राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत. 

दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन १९८९ साली बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते. आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे. 

सन २०१९ साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

राज्यपाल बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad