जुन्या सांडपाणी प्रकल्पाच्या निविदेत फिक्सिंग - रवी राजा यांचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2023

जुन्या सांडपाणी प्रकल्पाच्या निविदेत फिक्सिंग - रवी राजा यांचा आरोप


मुंबई - मुंबईतील सांडपाणी वाहून नेणा-या १०० वर्ष जुन्या पाईपलाईन्सच्या पुनर्निमाण प्रकल्पाचे काम एका विशिष्ट कंपनीला मिळावे यासाठी जिओपॉलिमर लायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आग्रह धरला जातो जातो आहे. त्यामुळे या निविदेत फिक्सिंग झाल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. जिओपॉलिमर लायनिंग हे तंत्रज्ञान जगभरात कुठेच यशस्वी ठरलेले नसताना एवढा आग्रह कशासाठी असा सवालही राजा यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.

मुंबईत सांडपाणी वाहून नेणा-या जुन्या पाईपलाईन्सचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामांत जिओपॉलिमर तंत्रज्ञानाचा आग्रह घरला जातो आहे. एका विशिष्ट कंपनीला याचे काम मिळावे हा यामागचा हेतू असल्याचे राजा यांनी म्हटले आहे. जिओपॉलिमर लायनिंग तंत्रज्ञान हे जगभरात कुठेच यशस्वी ठरलेले नाही. मुंबईसारख्या शहरात असे तंत्रज्ञान वापरल्याची उदाहरण देखील नाहीत. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा आग्रह फक्त एका विशिष्ट कंपनीला काम मिळावे म्हणून केला जात आहे हे स्पष्ट आहे. याआधी देखील या कामासाठी टेंडर काढले गेले होते. या टेंडरमध्ये 'मशीन वुंड स्पायरल लायनिंगचा आग्रह धरला गेला होता. हव्या त्या कंत्राटदाराला काम मिळावे हा या आग्रहामागचा हेतू असतो, याचा मुंबईकरांना फायदा होईल की नाही याचा विचार केला जात नाही असेही राजा यांनी म्हटले आहे.

सांडपाणी प्रकल्पाच्या निविदेत जिओपॉलिमरचा विशेष आग्रह धरला जात आहे, हे तंत्रज्ञान योग्य आहे का नाही यासाठी महापालिकेने आयआयटीसारख्या संस्थेचा सल्ला का घेतला नाही? हे ४०० कोटींचं टेंडर आहे आणि कामाचा आवाका देखील मोठा आहे, इतके मोठे काम करण्याचा अनुभव जागतिक कंपन्यांना देखील नाही. त्यामुळे एका कंपनीला काम देण्यापेक्षा पायलट प्रोजेक्ट देऊन कंपनी किती यशस्वीपणे काम पूर्ण करू शकते हे पाहिले का जात नाही असा सवालही रवी राजा यांनी विचारला आहे.

टेंडरमधील त्रूटी दूर करण्याची मागणी -
या प्रकल्पातील भागीदारांची संख्या २ च्या वर असू नये ही घातलेली अट चुकीची आहे. उलट इतक्या मोठ्या आकाराच्या प्रकल्पांमध्ये भागीदार ३ पर्यंत असण्याची मुभा द्यायलाच हवी. तसेच माईलस्टोन पेमेंटचा मुद्दा या टेंडरमध्ये नमूद करण्यात आला आहे, तो काढून टाकायला हवा. तसेच कंत्राटदाराने प्रकल्प कधी पूर्ण केला पाहिजे आणि तो नाही केला तर त्याला किती दंड लावायला हवा याचा तपशील असावा. सध्याच्या टेंडरमध्ये ज्या त्रुटी आहेत, त्याचा विचार करून त्यात तात्काळ बदल करावेत अशी मागणीही रवी राजा यांनी प्रशासक- आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad