मजारी जवळील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2023

मजारी जवळील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई


मुंबई - माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर मजारीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम उभारले जात असल्याची तक्रार बुधवारी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात केली. एका महिन्यांत हे बांधकाम हटवा अन्यथा मंदिर ऊभारू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर १२ तासात जिल्हाधिका-यांनी पालिका आणि पोलिसांच्या सहाय्याने कारवाई केली. दरम्यान याआधी या बांधकामांवर कारवाई का केली जात नव्हती असा सवाल उपस्थित केला जात आहे.

माहीमच्या समुद्रकिनारी हजरत मकदूम अली शाह हे याच जागेवर बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. या ठिकाणी सहाशे वर्षा पूर्वीपासून जुनी मजार आहे. या मजारबाबतची नोंदही असल्याचा दावा माहीम दर्गा ट्रस्टने केला आहे. या मजारीच्या बाजूलाच गेल्या काही वर्षात अनधिकृत बांधकाम करण्यात आले (चबुतरा) आहे. अनधिकृतपणे बांधकाम केले जात असताना याकडे मेरीटाईम बोर्डाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. बुधवारी शिवाजी पार्कवरील मेळाव्यात राज ठाकरे यांनी येथे अनधिकृत बांधकाम झाल्याचे सांगत एक व्हिडीओ दाखवला होता. हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासन स्तरावर तातडीने सूत्रे हलली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले व १२ तासाच्या आत दखल घेत महापालिका व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्तपणे या बांधकामावर तोडक कारवाई करीत हे बांधकाम हटवले.

जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर कारवाई -
माहीम समुद्रकिनारी असलेल्या दर्ग्यात मजारीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम केल्यामुळे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मोजमापणी केली. जितकी जागा मजारीची आहे ती जागा वगळता इतर जागेवर करण्यात आलेले बांधकाम अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या निर्देशानंतर मेरी टाईम बोर्डाने कारवाईसाठी पालिकेच्या मदतीने तोडक कारवाई केली. पालिकेकडे कारवाईसाठी लागणारे मशिनरी आणि मनुष्यबळ असल्याने हे बांधकाम पालिका प्रशासनाने हटवले. पालिकेचे अधिकारी जेसीबी आणि इतर मशिनरी तसेच मनुष्यबळ घेवून माहीम किनाऱ्यावरील या अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. यावेळी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारीही उपस्थित होते.

४० ते ५० झोपड्याही तोडल्या -
माहीम समुद्र किनारी काही झोपड्या बनवण्यात आल्या होत्या. या सर्व झोपड्या अनधिकृतरित्या उभारण्यात आल्या होत्या. आज पालिकेच्या सहाय्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने ४० ते ५० झोपड्यांवर तोडक कारवाई केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad