नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने देशवासियांना १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' म्हणजेच गायीला आलिंगन दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. पण, यावरून विरोधकांसह अनेक संस्थांकडून टीका करण्यात आली. त्यामुळे आता केंद्र सरकारने हे आवाहन मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने परिपत्रक काढत याबद्दल माहिती दिली आहे.
८ फेब्रुवारीला अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने १४ फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन केले होते. यादिवशी गायींना मिठी मारून त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करावे, असे सांगण्यात आले होते. यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हणाले होते की, "गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटापुढे आपण आपली संस्कृती, वारसा विसरलो आहोत. गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करावा." असे म्हंटले होते. यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली. केंद्र सरकारने केलेले हे आवाहन प्रत्यक्षात शक्य नसल्याचे सांगत विविध स्तरातून टीका करण्यात आली. तसेच, अनेक मिम्सही व्हायरल झाले. यानंतर हा निर्णय मागे घेतला असल्याची मोठी घोषणा करण्यात आली.
No comments:
Post a Comment