भगवान बुध्द यांचा अस्थीकलश रथ आज मुंबईत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2023

भगवान बुध्द यांचा अस्थीकलश रथ आज मुंबईत


मुंबई - थायलंड येथून निघालेला भगवान बुध्द यांचा अस्थीकलश रथ आणि भंतेजींची पदयात्रा भारतातील विविध राज्यांत भ्रमण करत महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. थायलंड येथील ११० बौद्ध भिक्खू, भारतातील भिक्खू आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन १७ जानेवारीला परभणी येथून निघालेली अस्ती कलश धम्मयात्रा आज मुंबईत दाखल होत आहे. या धम्मयात्रेचे मुंबईत जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. 

गेल्या महिन्यांपासून महाराष्ट्रात परभणी ते मुंबई बौद्ध धम्म पदयात्रा फिरत आहे. या पदयात्रेमुळे महाकारुणी तथागतांच्या अस्थींचे दर्शन मिळावे अशी उपासकांची इच्छा पूर्ण झाली आहे. बुद्धांच्या अस्थी कलशाच्या मंगल आगमनाने, सोबत थायलंडच्या भिक्खू संघाची पदयात्रा यामुळे ठिकठिकाणी दर्शनासाठी रांगा पाहायला मिळाल्या. बुद्ध विहारात दर्शनासाठी जनसागर उसळला आणि हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लिन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ भारतीयांना झाला आहे. 

आज मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मुलुंड चेक नाक्याजवळून माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथे स्वागत केले जाणार आहे. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी धम्म पदयात्रा तसेच थायलंडचे भंतेजी यांचे स्वागत बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मुंबईत जोरदार करण्याचे आव्हान शाखा पदाधिकाऱ्यांना केले आहे.

धम्म पदयात्रेचा समारोप १५ फेब्रुवारीला मुंबईत चैत्यभूमी येथे होत आहे. या धम्म पदयात्रेत थायलंडमधून आणलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थीधातूंचे दर्शन मुंबईतील जनतेला होणार असून या दर्शनाचा लाभ  घेण्यासाठी आणि पूज्य भिक्खू संघाच्या स्वागतासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरी जनतेने बौद्ध उपासक उपासिकांनी धम्म पदयात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad