मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चार तरण तलावांसाठी आतापर्यंत वार्षिक सदस्यत्व देण्यात येत होते. आता यात सुधारणा करण्यात आली असून सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना त्रैमासिक व मासिक सदस्यत्व देण्याचा मार्गही प्रशासनाने खुला केला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी तसे आदेश दिले आहेत. ज्यांना सदस्यत्व मिळू शकणार नाही, अशा इच्छुकांसाठी ऑनलाईन प्रतिक्षा यादीचा पर्याय देखील आता खुला करण्यात आला आहे. तसेच तलावांमध्ये पोहणा-या सभासदांची संख्या ‘लाईव्ह डॅशबोर्ड’द्वारे देखील लवकरत कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील असलेल्या चार जलतरण तलावांचे सभासदत्व घेण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ऑनलाईन सभासद नोंदणी प्रणाली विकसित करून २३ ऑगस्ट २०२२ पासून नागरिकांसाठी खुली केली होती. जलतरण तलावांच्या सदस्यत्वासाठी प्रथमच सुरु करण्यात आलेल्या या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद लक्षात घेऊन आता सदर सुविधा अधिक व्यापक करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षात येत्या ३ जानेवारी २०२३ पासून नव्याने सभासद नोंदणी सुरू करण्यात येत आहे. सभासद नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळासह बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ असेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर ऑनलाईन अर्ज असेल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment