मुंबई - भारताने जागतिक स्तरावर नाव कोरणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आपल्या भारत देशाला जर प्रगतिपथावर आरूढ करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवरून ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha pe charcha) अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलास गप्पा मारत उत्तरेही दिली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Bmc School) वरळी सी-लिंक येथील शाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. शॉर्टकट, कॉपीपासून त्यांनी दूर रहावे. चांगल्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी. अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करून जो विषय कठीण वाटतो त्याचा अधिक सराव करावा, असा कानमंत्र नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थी दशेत असताना परीक्षेसंदर्भात उद्भवणारे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना विचारले, त्यावर त्यांनी उदाहरणांसह प्रश्नांची उत्तरे दिली. वरळी येथील पालिकेच्या शाळेत कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाच्यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, सीमा चतुर्वेदी, प्रशासकीय अधिकारी वर्षा गांगुर्डे विभाग निरीक्षक रुता वानखेडे, दिनकर पवार तसेच शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment