मुंबई - राज्यातील १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलनासाठी बसल्या आहेत. काही महत्त्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु असून जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
प्रशासनाच्या दडपशाहीला कंटाळून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका सरकारकडून ठोस आश्वासन मिळून त्याची योग्य अंमलबजावणी होईल या हेतूने आझाद मैदानात दाखल मंगळवारी सकाळपासूनच दाखल झाल्या आहेत. जळगाव, सटाणा, सांगली, उल्हासनगर, ठाणे, पालघर, अलिबाग अशा प्रमुख शहरातील अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी क्रांतीज्योती सावित्री बाई फुलेंचा मुखवटा धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारविरोधातील घोषणाबाजी केली. शिवाय, मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय माघार नाही -
मानधनात भरीव वाढ द्यावी या प्रमुख मागणीसह पोषण ट्रॅकर अॅपसाठी चांगला कार्यरत मोबाईल द्यावा यासह इतर महत्त्वाच्या मागणी साठी आज अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत. अनेक वर्षांचा राग असल्याकारणाने या सेविका आपलं घर-दार सोडून आंदोलनासाठी आल्या आहेत. नवीन सरकार आश्वासने देत आहेत पण, अंमलबजावणी होत नाही. जन्मभर काम करुनही त्यांना काहीही मिळत नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय माघार घेणार नाही असा विचार करुनच त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत.
- - एम.ए.पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
No comments:
Post a Comment