मुंबई - प्रदूषण वाढल्याने पुढील दोन दिवसांत मुंबईतील हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. खालावलेली गुणवत्ता आरोग्यासाठी त्रासदायक ठरु शकते. त्यात श्वास घेण्यात त्रास, थकवा जाणवतो असे प्रकार होऊ शकतात. त्यातही विशेषत: अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे शारिरिक परिश्रमाची कामे टाळावीत व आरोग्याची काळजी घ्यावी असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सफर प्रणालीकडून हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आणि हवेच्या गुणवत्तेचा अंदाज दिला जातो. त्यानुसार, हवेच्या गुणवत्तेचे चांगली, समाधानकारक, सामान्य, धोकादायक, अतिधोकादायक असे निष्कर्ष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांनुसार, मुंबईतील हवा बिघडल्याचे दिसते आहे. तर काही प्रमाणात थंडीही सुरु झाल्याचे जाणवते आहे. दुसरीकडे शहरातील प्रदूषणातही वाढ झाली आहे. धूलिकणांचे प्रमाण वाढून हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे दोन दिवसांत मुंबईची हवा अतिधोकादायक पातळीवर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतील कुलाबा, माझगाव, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई, येथील हवेची गुणवत्ता अतिधोकादायक, तर भांडूप परिसरातील हवा धोकादायक पातळीवर असू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment