शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे व उद्धव ठाकरे गटात राजकीय घमासान सुरु आहे. शिवसेनेतून ४० आमदार व १२ खासदार शिंदे गटात गेल्यानंतर राज्यातील काही ठिकाणी माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. मात्र मुंबईत माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होतील ही शक्यता कमी असताना आतापर्यंत आठ माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. यात सुरुवातीला शीतल म्हात्रे, तसेच ईडीच्या भीतीने यशवंत जाधवही शिंदे गटात दाखल झाले. दिलीप लांडे (मामा) हे आमदार व नगरसेवकही आहेत. ते आमदार फुटले त्यांचवेळी शिंदे गटात सहभागी झाले. आमदार सदा सरवणकर सामील झाल्याने त्यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकरही हेही शिवसेनेत दाखल झाले. खासदार राहुल शेवाळे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या वहिनी माजी नगरसेवक वैशाली शेवाळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर माजी नगरसेवक परमेश्वर कदम, आत्माराम चाचे यांच्यानंतर वरळी वॅार्ड क्रमांक १९५ मधील संतोष खरातही यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.
वरळी हा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदार संघातील संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकर गटाला हा मोठा धक्का मानला जातो. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शिंदे गटाचीही जोरदार तयारी सुरु असून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. ठाणे, नवीमुंबई आदी ठिकाणचे नगरसेवकांना गळाला लावल्यानंतर आता भाजपच्या मदतीने मुंबईतील नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नगरसेवक फुटल्याने हा मोठा धक्का मानला जातो आहे.
No comments:
Post a Comment