मुंबईला व ठाणे येथील काही भागांना ठाणे जिल्ह्यातील तानसा, मोडकसगर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि भातसा या पाच तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबई महापालिकेने आतंकवादी हल्ल्यापासून जलवाहिन्यांचे संरक्षण होण्यासाठी ठाणे व मुंबई भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी जलबोगद्याद्वारे भूमिगत केली आहे. या जलबोगद्याला ठाणे जिल्ह्यात एका ठिकाणी कूपनलिकेचे काम चालू असताना मोठी हानी झाली. त्यामुळे आता या जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे झाले. त्यानुसार पालिका जल अभियंता खात्यामार्फत आज २० जानेवारीपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
भांडुप संकुलात नवीन पाणी वितरण व्यवस्था बंद करून जुन्या पाणी वितरण व्यवस्थेमार्फत पाणीपुरवठा होणार आहे. या कारणास्तव भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जुन्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्यात येणार आहे. मुलुंडमधील वीणा नगर, वैशाली नगर, स्वप्ननगरी, योगी हिल्स तसेच मुलुंड पश्चिम विभागातील तांबे नगर चेकनाका व ठाणे येथील किसन नगर या परिसरात आज (२० जानेवारी) पासून प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे मुलुंड पश्चिम येथील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment