चेन पुलिंग प्रकरणी 8176 रेल्वे प्रवाशांकडून 55.86 लाखांचा दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2023

चेन पुलिंग प्रकरणी 8176 रेल्वे प्रवाशांकडून 55.86 लाखांचा दंड वसूल


मुंबई - ट्रेन मध्ये अत्यावश्यक असल्यास चेन ओढा असे आवाहन नेहमी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्यानंतरही अनेकजण कारण नसताना चेन ओढतात. 2022 या वर्षात मध्य रेल्वे अंतर्गत 9049 अनावश्यक अलार्म चेन पुलिंग (ACP) प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी सुमारे 8176 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 55.86 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेने मेल, एक्स्प्रेस तसेच दैनंदिन प्रवासासाठी असणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अलिकडे प्रवासी उशिरा स्थानकावर पोहोचले किंवा प्रवाशांना मधल्याच स्थानकांवर उतरायचे असेल इत्यादी अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग (ACP)चा वापर केला जात असल्याचे आढळले आहे. ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगचा अनावश्यक वापर केल्यास (ACP केवळ त्या विशिष्ट ट्रेनवरच नाही तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. तसेच इतर सर्व प्रवाशांचीही गैरसोय होते, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

अनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग (ACP) करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान 30 मिनिटे आधी टर्मिनस स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला रेल्वेने प्रवाशांना दिला आहे.

मुंबई विभाग – 3302 व्यक्ती – 23.79 लाख रुपये दंड
भुसावळ विभाग – 2476 व्यक्ती – 19.12 लाख रुपये दंड
नागपूर विभाग – 1024 व्यक्ती – 8.65 लाख रुपये दंड
पुणे विभाग – 1173 व्यक्ती – 2.94 लाख रुपये दंड
सोलापूर विभाग – 202 व्यक्ती -1.36 लाख रुपये दंड

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad