मुंबई - पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अश्या औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर आयुर्वेदातून 'रामबाण' उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.
राजभवन येथे 'आयुर्वेद शिरोमणी' सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तसेच प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा, अध्यक्ष, नितिमत्ता व नोंदणी समिती, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते. उभय नामवंत आयुर्वेदाचार्यांना आयुर्वेदाच्या उल्लेखनीय सेवेसाठी वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आले.
आज आधुनिक चिकित्सा पद्धतीला पर्याय नाही. परंतु अनेक ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट देखील असतात. या दृष्टीने भारतातील आयुर्वेदिक ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध कसा करता येईल व आयुर्वेदाच्या माध्यमातून जगाला निरामय जीवन जगण्याचा मार्ग कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
आज राजस्थान, उत्तराखंड, पंजाब तसेच गुजरात येथे स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात देखील ८० आयुर्वेद महाविद्यालयाने कार्यरत आहेत. राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास व नियंत्रणासाठी राज्याने एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावे, अशी सूचना आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी यावेळी केली. राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवन येथे देखील राज्यपालांनी एक आयुर्वेद क्लीनिक सुरु करावे, अशी सूचना त्रिगुणा यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाला वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनचे विश्वस्त वैद्य महेंद्र चतुर्वेदी, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक डॉ राजेश्वर रेड्डी, डॉ गोविंद रेड्डी, अनेक वरिष्ठ आयुर्वेद चिकित्सक, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.
No comments:
Post a Comment