मुंबई - गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयातील विविध विकास कामांमध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे. मंत्रालयात असलेल्या विविध दालनातील परदे, खिडक्यांच्या काचा, टेबल-खुर्च्या बदलण्यासारख्या कामांसह विविध मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरूस्ती कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी.विशेषत: केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली तर भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत पोहचून मुख्य सुत्रधारापर्यंत पोहचता येईल. याप्रकरणाची चौकशी केली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील पाटील यांनी दिला. राज्य सरकारने चौकशी केली नाही तर उच्च न्यायालयात जावून यासंदर्भात कायदेशीर लढाई देखील संघटना लढेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे हा विभागाच भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनला आहे. पीडब्ल्यूडी मंत्र्यांची कागदोपत्री दिशाभूल करीत अधिकार्यांकडून आतापर्यत हा भ्रष्टाचार करण्यात आला.विभागातील भ्रष्टाचाराचे सखोल पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.पुरावे देवून देखील संबंधितांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील जनता पेटून उठेल आणि यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या कामांमध्येही भ्रष्टाचार -
* विधानसभा-विधान परिषदेतील कामे
* मलबारहील येथील वर्षा शासकीय बंगला
* अधिकार्यांचे शासकीय निवासस्थाने
* मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ
No comments:
Post a Comment