मुंबई - मुंबईतील नादुरुस्त झालेले मॅनहोल, झाकणांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने शहर भागातील कुलाबा ते माहीम दरम्यान नवीन मॅनहोल, झाकणांची दुरूस्ती, जाळ्या बसवणे आदी कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी तब्बल दहा कोटींवर खर्च येणार आहे. शहरासह उपनगरातील मॅनहोलचे कामही लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी एक लाखांहून अधिक मॅनहोल आहेत. त्यापैकी शहरात २५ हजार तर पूर्व-पश्चिम उपनगरात सुमारे ७४ हजारांहून अधिक मॅनहोल आहेत. अधून मधून देखभाल, दुरुस्ती आणि सफाईसाठी कंत्राटदार, पालिका कर्मचार्यांकडून हे मॅनहोल उघडले जातात. पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी नागरिकांकडूनही बेकायदेशीररित्या मॅनहोल उघडले जात असल्याचे आढळून आले आहे. मॅनहोल उघडे राहिल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. गेल्या पाच वर्षांत शहरात पर्जन्यजलवाहिन्या विभागा अंतर्गत २५ हजार मॅनहोलपैकी सुमारे ३ हजार ९२० तर उपनगरात मलनि:स्सारण विभागाच्या ७४ हजार मॅनहोलपैकी १७४५ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
नवीन वर्षात कामे सुरु होणार -
शहर भागात कुलाबा ते माहीम परिसरात जुन्या ब्रिटिशकालीन पर्जन्यजलवाहिन्यांचे मोठे जाळे आहे. अनेक मॅनहोलची झाकणांची दुरूस्ती, संरक्षक जाळ्या तसेच पर्जन्यजलवाहिन्यांच्या प्रवेशाजवळ कामे केली जाणार आहेत. या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया नवीन वर्षात जानेवारीत ही कामे सुरू होणार आहेत. सुमारे वर्षभर ही कामे सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागातर्फे देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment