धोकादायक म्हणून जाहीर केलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले पूल पुर्नबांधणीसाठी 7 नोव्हेंबर 2022 पासून संपूर्णतः बंद करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सदस्य सुनील राणे, अस्लम शेख, अमीन पटेल, झिशान सिद्दीकी, नाना पटोले आदींनी लक्षवेधी सूचना केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. मुंबई शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाची आवश्यकतेनुसार चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व पुलांचे ऑडिट -
लक्षवेधीवर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की गोखले पूल हा 7 नोव्हेंबर 2022 पासून बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या पुलाचे काम रेल्वे, महानगरपालिकेच्यावतीने युद्धपातळीवर सूरू करण्यात आले आहे. यासाठी 82 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. यापैकी 17 कोटी रेल्वेला देण्यात आले आहेत.
या पुलाचे काम तीन टप्प्यात होणार आहे. गोखले पुलाची पहिली मार्गिका मार्च 2023 पर्यंत तर दुसरी मार्गिका डिसेंबर 2023 पर्यंत चालू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. या पुलाचे काम का प्रलंबित होते याबाबत सविस्तर चौकशी केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
मुंबईतील जनतेची सुरक्षा महत्त्वाची असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाला सूचना करण्यात येईल. तसेच याबाबत परिवहन व महानगरपालिका तसेच संबंधीत विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. उर्वरित पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून काम पूर्ण केले जाईल, असेही मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेमध्ये सदस्य अमित साटम, आशिष शेलार, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतुल भातखळकर, पराग अळवणी यांनी सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment