डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन



मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार असून ज्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधेअभावी पुढील शिक्षण घेवू शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच प्रथम वर्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर पैसे थेट जमा करण्यात येतात. 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

12 वीमध्ये विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण असल्यानंतर स्वाधार योजनेचा पदवी पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. पदवी, पदविका दोन वर्षापेक्षा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांस लाभ घेण्यासाठी किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात श्रेणी असणे आवश्यक आहे.

12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांपेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौद्ध घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. त्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.

मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत 4 था मजला, आर.सी. चेंबुरकर मार्ग, चेंबूर मुंबई-400071. येथे संपर्क करण्याचे आवाहन खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad