मुंबई - कोरोनामुळे मुंबईत थंडावलेली प्लास्टिक बंदी कारवाई १ जुलैपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने मागील पाच महिन्यांत ३७९८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. यातून ३४ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली. दरम्यान प्लास्टिक कारवाई आणखी तीव्र केली जाणार असून तशाप्रकारे संबंधित अधिका-यांना निर्देश दिल्याचेही कबरे यांनी सांगितले.
मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई धडाक्याने सुरु झाली होती. मात्र कोरोनाचे संकटामुळे दोन वर्ष प्लास्टिक कारवाई थांबली होती. गेल्या १ जुलैपासून ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलै नंतर आतापर्यंत मागील पाच महिन्यात ३७९८ किलोवर प्लॅास्टिक जप्त केले आहे. तर ३४ लाख ७५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणार्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. दरम्यान, मॉल, हॉटेल आदी मोठ्या व्यवसायांच्या ठिकाणी कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे कबरे यांनी सांगितले.
हॉटेल्स, ऑनलाईन फूड पालिकेच्या रडारवर -
मुंबई महापालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदी मोहिम आता तीव्र केली जाणार असून हॉटेल्स, ऑनलाईन फूड पालिकेच्या रडारवर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑनलाईन फूड चैन आणि हॉटेल, रेस्टॉरंटकडून वाढलेल्या प्लास्टिकच्या वापराकडे पालिकेने लक्ष वेधले आहे. प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच मुंबई महानगरपालिकेकडून पावले उचलली जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून हॉटेल इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व करणारी आहार संघटना आणि ऑनलाईन फूड चैनच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्लास्टिकला पर्याय आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचे कबरे यांनी सांगितले.
या प्लास्टिकवर बंदी -
५० मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणार्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या); प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणार्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणार्या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment