बँक कर्जासाठी फेरीवाल्यांकडून ४० हजार अर्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2022

बँक कर्जासाठी फेरीवाल्यांकडून ४० हजार अर्ज



मुंबई - फेरीवाल्यांना सुलभ रीतीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत फेरीवाल्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी पालिकेने विभागवार मोहिम सुरु केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळतो असून आतापर्यंत ४० हजार अर्ज पालिकेकडे आले आहेत. येत्या ३ डिसेंबरपर्यंत ही मोहिम असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील फेरीवाल्यांसाठी कर्जाची प्रक्रिया सुलभ पद्धतीने व्हावीत यासाठी मुंबई महापालिकेकडून विभागानिहाय अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज कसा भरावा, याची माहिती देऊन ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. फेरीवाल्यांकडे परवाना आहे अशा अर्जाची प्रक्रिया सुलभ आहे. परंतु ज्यांच्याकडे परवाना नाही अशा फेरीवाल्यांसाठीही लेटर ऑफ रेकमंडेशन (एलओआर) नुसार अर्ज केले जात आहेत. ३ जानेवारीपर्यंत राबवणा-या या मोहिमेत ४० हजार फेरीवाल्यांनी अर्ज केले आहेत. कर्ज मिळवण्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केले जात आहेत. एकदा अर्ज केल्यानंतर फेरीवाल्यांना एलओआर उपलब्ध होतो. एलओआर उपलब्ध झाल्यानंतर आणखी एक अर्ज दुसऱ्या टप्प्यात करावा लागतो. अनेक फेरीवाल्यांकडून एलओआर मिळवले जात आहे. पण प्रत्यक्षात कर्जासाठी अर्ज करण्यात येत नाही असेही प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पालिकेकडून मोहिमेद्वारे या योजनेची माहिती दिली जाते आहे. पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेकांनी ही व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून पालिकेकडे विनंती केली. त्यानुसार आता पालिकेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विभागनिहाय प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत महिनाभरात साडेतिनशेहून अधिक कॅम्प आयोजित करण्यात आले, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी दिली.

कर्ज पुरवठ्याच्या योजनेनुसार फेरीवाल्यांना १० हजारांचे कर्ज दिले जाते. बँकेकडे अर्ज सादर केल्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पात्र असणा-यांना बँकेकडून कर्ज दिले जाते. त्यामध्ये वर्षभरात सुलभ हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करण्याची सुविधा असणार आहे. वेळेत कर्ज परतफेड करणा-यांना बँक पुन्हा पहिल्याच माहितीच्या आधारे कर्ज देते. त्यामुळे विना व्याज कर्ज घेणे आता फेरीवाल्यांना सुलभ होणार आहे. आतापर्यंत ४० हजार अर्ज आले असून ३ डिसेंबरपर्यंत या अर्जाची संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कर्जाबाबतची प्रक्रिया संबंधित बँकामार्फत -
पालिकेने फेरीवाल्यांकडून घेतलेले अर्ज संबंधित बँकांकडे कर्ज मिळण्यासाठी दिले जाणार आहे. बँकेकडून अर्ज व त्यासंबंधित कागदपत्रांची छाननी करून कर्जाबाबतची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. फेरीवाल्यांची माहिती बँकांकडे राहणार असल्याने पुन्हा कर्ज घेण्यासाठी सोपे जाणार आहे. मुदतीत कर्ज परत करणा-या फेरीवाल्यांना पुन्हा त्याच कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad