मुंबई - २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून चेंबूर येथे महाराष्ट्र शासन तर्फे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला मुलींसाठी शासकीय उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचा उदघाटन सोहळा दुपारी ४ वाजता फाईन आर्ट सोसायटी चेंबूर येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
चेंबूर हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असून या बलेकिल्ल्यातच नवबौद्ध मुला मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण इमारतीच्या उदघाटनाला आमच्या नेत्याला निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळे आम्ही तीव्र नाराज आहोत अशी संतप्त प्रतिक्रिया रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे, महिला नेत्या सोना सिंग आदी कार्यकर्त्यांनी उद्याच्या कार्यक्रमावर निषेध निदर्शने करण्याचा मानस व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या चेंबूर मधील संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात रामदास आठवले यांना निमंत्रित न केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत यासाठी उद्या निषेध म्हणून आंदोलन करण्याचा ईशारा रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी दिला आहे. तर आमच्या बालेकिल्ल्यात रिपब्लिकन हृदयसम्राट रामदास आठवले यांना निमंत्रित न करून रिपब्लिकन जनतेचा अवमान करणार असाल तर या अपमानाच्या निषेधार्थ उद्या कार्यक्रमासमोर रिपाइंच्या नेत्या सोना सिंग आणि तालुका अध्यक्ष अनिस पठाण आत्मदहन करणार असल्याचा ईशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment