मुंबई - कोरोना काळात मुंबई पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने केलेल्या १२ हजार कोटींच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी आज (मंगळवार ता. २२ नोव्हेंबर) ‘कॅग’चे पथक महापालिका मुख्यालयात दाखल झाले. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कामांचे आणि केलेल्या खर्चाचे ऑडिट केले जाणार आहे. ‘कॅग’ला सहकार्य करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.
कोरोना काळात महापालिकेत १२ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. याप्रकरणी भाजपने सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनावरही निशाणा साधला होता. कोरोना काळात निविदा प्रक्रिया न राबवता प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजनांसह खरेदीसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. याविरोधात भाजपाने पालिकेत आंदोलने केली होती. मात्र त्याकडे सात्ताधरी शिवसेनेने दुर्लक्ष केले होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनेही दुर्लक्ष केले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महापालिकेतील या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी भाजपने राज्य सरकारकडे केली होती. पुढे राज्य सरकारने हे प्रकरण चौकशीसाठी ‘कॅग’कडे सोपवले.
राज्य सरकारने कॅगला पाठवलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत विविध १० विभागांमध्ये करण्यात आलेल्या १२ हजार २३ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘कॅग’चे पथक महापालिका मुख्यालयात दाखल झाले. ‘कॅग’च्या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास आयुक्त आणि ‘कॅग’च्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
कोरोना काळात स्थायी समितीची मंजुरी न घेता हजारो कोटींचे प्रस्ताव मान्य करण्यात आले. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने हे गैरव्यवहार झाले आहेत. नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाली आहे; मात्र ‘कॅग’मार्फत होणाऱ्या चौकशीतून सत्य समोर येईल असे भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.
पालिकेने कोरोना काळात कोणतेही ऑडिट न करता अनेक प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा पैसा वाया गेला. पालिकेचे काम आम्ही नाकारत नाही; मात्र खर्च पारदर्शकपणे झालेला नसल्याने ‘कॅग’च्या चौकशीचे स्वागत आहे. सध्या प्रशासक असताना सुरू असलेल्या कामांचीही चौकशी व्हायला हवी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
‘कॅग’च्या रडारवर काय आहे -
(आकडे कोटींमध्ये) -
कोरोना काळात विविध उपाययोजना व खरेदीसाठी झालेला खर्च ः ३,५३८.७३-
तीन रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली खरेदी ः ९०४.८४-
चार पुलांच्या बांधकामावर झालेला खर्च ः १,४९६-
दहिसरच्या अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी ः ३३९.१४-
तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रांसाठी खर्च ः १,१८७.३६- ५६
रस्त्यांच्या दुरुस्तीवरील खर्च ः २,२८६.२४-
सहा सांडपाणी प्रकल्पांवरील खर्च ः १,०८४.६१-
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील खर्च ः १०२०.४८
No comments:
Post a Comment