मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आपण कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरच्या दौऱ्यावर असतानाही त्यांना मारण्याचा कट रचला गेला होता. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने ते नक्षलवाद्यांच्याही टार्गेटवर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्य पोलिसांना नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यास सांगितले होते.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ,’’ असे धमकीवजा पत्र सीपीआय (माओवादी) या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद होते व याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हणत शिंदे व त्यांच्या परिवाराला याची पूर्णकिंमत चुकवावी लागेल,’’ अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.
पाच तारखेला एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक बीकेसी मैदानावर जमणार आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून जवळपास चार ते पाच लाख लोक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभाग, पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
कोणत्याही धमकीला घाबरत नाही -
राज्याची पोलिस यंत्रणा अतिशय सजग आणि सतर्क आहे. माझा पोलिस यंत्रणेवर पूर्णतः विश्वास आहे. त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही. मला अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. यापूर्वीही मी गडचिरोलीमध्ये काम करत असताना मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मात्र गृहमंत्री हे सक्षम आहेत आणि पोलीसही सक्षम असल्याने मला कशाचीही भीती नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. दरम्यान मी जनतेमध्ये मिसळून माझे काम करत असतो. माझ्या कामाची पद्धत ही जनता भिमुख आहे. ती तशीच कायम राहणार मी कशालाही घाबरून कामाची पद्धत बदलणार नाही. मी माझे जनतेच्या प्रति असलेले काम करतच राहणार, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
No comments:
Post a Comment