मुंबई - मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणा-या दुकानांची पालिकेने सोमवारपासून तपासणी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी २ हजार १५८ ठिकाणी केलेल्या तपासणीत एक हजार ६३६ दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे. तर अजूनही यापैकी ५२२ दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळले असून संबंधितांना नोटिस देण्यात आले आहेत. पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईतील दुकाने व आस्थापनांना दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी दुकानदारांना पालिकेने तीन वेळा मुदतवाढ दिली. मात्र त्यानंतरही सुमारे पाच लाख दुकानांपैकी ५० टक्के दुकानदारांनीच मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून सोमवारपासून मुंबईभरात दुकानांची तपासणी करुन नोटिस देणे सुरु केले आहे. पहिल्या दिवसांत २ हजार १५८ ठिकाणी पालिकेच्या पथकाने तपासणी केली. यापैकी ५२२ दुकानदारांनी अजूनही मराठी पाटया लावण्य़ाकडे दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले आहे. अशा दुकानदारांना नोटिसा दिल्या असून सात दिवसांत मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे. उर्वरित दोन लाखाहून अधिक दुकानदारांनी अद्याप दुर्लक्ष केल्याने सोमवारपासून तपासणी करून कारवाईला सुरुवात केली आहे. ज्या दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाटी नसेल त्या दुकानदारांना नोटिस देऊन महानगर दंडाधिका-यांमार्फत कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचार्यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे.
मात्र, यापूर्वी तीन वेळा मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात होणार्या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी नसल्यास दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment