मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ६ सप्टेंबर पासून "नफरत छोडो भारत जोडो" यात्रा काढली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालय महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पर्यंत "नफरत छोडो भारत जोडो" मार्च काढला जाणार आहे. या मार्च मध्ये राजकीय पक्ष आणि एन जी ओ सहभागी होतील अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
मुंबई काँग्रेसच्या वतीने सर्व पक्षीय "नफरत छोडो भारत जोडो" मार्च काढला जाणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना, आज लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकशाही आणि राज्य घटना धोक्यात आहे. कोणालाही विश्वासात न घेता नवनवीन कायदे मंजूर केले जात आहेत. तपास यंत्रणा आपल्या बटीक असल्यासारख काम करत आहेत. संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही. संसदेत गांधी पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करणे बंद केले आहे. लोकांमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. यासाठी १४० कोटी भारतीयांची मने जोडण्यासाठी ६ सप्टेंबरपासून राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून "नफरत छोडो भारत जोडो" अभियान सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत भाजपा, आम आदमी पार्टी आणि एमआयएम हे पक्ष वगळता मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून मंत्रालय येथील "भारत जोडो मार्च" काढला जाणार आहे. या मार्चमध्ये मुंबईमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी, डावे पक्ष, शेकाप आदी पक्ष आणि २८ एनजीओचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. या मार्चला जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी जी पारेख हिरवा झेंडा दाखवणार असून मार्चच्या अखेरीस संविधानाची शपथ देणार आहेत अशीही माहिती जगताप यांनी दिली.
No comments:
Post a Comment