ऐन दिवाळीत बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर, प्रवाशांचे हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2022

ऐन दिवाळीत बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर, प्रवाशांचे हाल


मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी चालकांनी गेल्या सहा महिन्यांत विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलन करून लक्ष वेधले आहे. मात्र त्यांचे प्रश्न जैसे थे राहिल्याने त्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते आहे. ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांताक्रुझ बेस्ट बस आगारातील शेकडो बस कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. या कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मिळालेला नाही. ठरलेला पगार दिला जात नाही. सुट्ट्यांबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागणार आहे.

या कंत्राटी कामगारांना समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याची तक्रार कंत्राटी कामगारांची आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कामयस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही अनेकवेळा बेमुदत संप केल्याने संबंधित आगारातील बसेस चालवण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. या संपामुळे बेस्टचेही नुकसान झाले आहे. नियमानुसार सेवा न दिल्याने बेस्टने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईही केली आहे. मात्र त्यानंतरही कामगारांच्या प्रश्नांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बेस्टचे कंत्राटी कामगार आक्रमक झाले आहेत. ऐन दिवाळीत सांताक्रूझ डेपोमधील ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी आंदोलनावर ठाम -
जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तसेच या मागण्या मान्य केल्याचे लिखित पत्र दिले जात नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad