मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन यांनीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत, असा निशाणा साधतानाच शिवसेना नेमकी कुणाची ते आता जनसागर पाहून सांगायची गरज नाही. या जनसागरानेच महाराष्ट्र आणि देशाला उत्तर दिले. त्यामुळे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील बीकेसी मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवले. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी आहे. हे मैदान जरी तुम्हाला मिळाले असले तरी शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. शिवसेनाप्रमुखांची भूमिका आमच्यासोबत आहे आणि ही परंपरा तुम्ही मोडीत काढली, अशी टीका शिंदेंनी केली.
सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या विचारांना तुम्ही मूठमाती दिली. मग सांगा तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा नैतिक अधिकार मिळतो का, बोलण्याचा नैतिक अधिकार उरलाय का, हजारो शिवसैनिकांनी आपले घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला तो तुम्ही वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वाकांक्षासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकार आणि पक्षाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला, त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागला, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते मला कटप्पा म्हणाले. अरे कटप्पा पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? शिवसैनिकांना त्रास देताय, अरे असे बोगस काम आम्ही करणार नाहीत. आम्ही समोरून वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत, असेही शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. शिवेसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची, शिवसेना बाळासाहेबांची.आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे. आम्ही केले ते राज्याच्या हितासाठी केले. आमची भूमिका जनतेलादेखील मान्य आहे, हेच या मेळाव्याने दाखवून दिले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटात -
हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. हा एकनाथला एकटानाथ होऊ देऊ नका. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही भूमिका मला आवडल्या, असे व्यासपीठावर उपस्थित जयदेव ठाकरे यांनी म्हटले. जयदेव ठाकरे यांची खुर्ची मुख्यमंत्र्यांच्या शेजारी लावली होती.
No comments:
Post a Comment