मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने यंदाच्या महापरिनिर्वाण दिनावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. मुंबईत दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. या स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या अनुयायांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
सन २०२० व २०२१ या २ वर्षात महापरिनिर्वाण दिनी कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्बधांचे पालन करुन अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले होते. या दोन्ही वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विनंतीला व आवाहनांना अनुयायांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चैत्यभूमीवर गर्दी केली नव्हती. या सहकार्यासाठी अनुयायांचे पालिका आयुक्तांनी आभार मानले आहेत. महापालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी आयुक्त बोलत होते. बृहन्मुंबई महापालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा सुविधांचे नियोजन करण्याचे तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
या बैठकी दरम्यान ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती महापालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी उपस्थितांना दिली.
बैठकीला यांची उपस्थिती -
या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उप आयुक्त प्रणय अशोक, पोलिस उप आयुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन, तसेच पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. भंते राहूल बोधी – महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, उपाध्यक्ष रवी गरुड, श्रीकांत भिसे, दिलिप थोरवडे आणि मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment