मुंबई - अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. भाजपा उमेदवार मुरजी पटेल आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केलं. यामध्ये त्यांनी संपत्ती, शिक्षण, दाखल गुन्ह्याची माहिती यासह इतर माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार मुरजी पटेल यांच्याकडे 10 कोटी 41 लाख रुपयांची तर ऋतुजा लटके यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती 10 कोटी 41 लाख रुपयांची आहे. यापैकी पाच कोटी 41 लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहे तर पाच कोटी रुपयांची संपत्ती आपत्यांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्याकडे गुजरातमधील कच्छ येथे 30 एकर जमीन आहे तर त्यांच्या पत्नीच्या नावावर कच्छ येथे 30 एकर जमीन आहे. या जमीन 2013-14 मध्ये 98 लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. याची सध्याची किंमत चार कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. मुरजी पटेल यांचं शिक्षण नववीपर्यंत झालं आहे. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी रुपयांचं कर्ज आहे.
ऋतुजा लटके यांच्याकडे 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर 12.35 एकर जमीन आहे. ऋतुजा लटके यांच्यावर 15 लाख 29 हजार रुपयांचे गृह कर्ज आहे. ऋतुजा लटके यांच्याकडे 75 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या मुलाकडे पाच हजार रुपये आहेत. ऋतुजा लटके यांच्याकडे 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेत त्यांच्या नावे चिपळूणमधील एका घराचा उल्लेख आहे. पती स्वर्गीय रमेश लटकेंची मालमत्ता त्यांच्या नावावर झालेली नाही. ती प्रक्रिया सुरू असल्याचं प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले आहे. ऋतुजा लटके यांनी कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
No comments:
Post a Comment