मुंबई - सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू या आजारांचा झपाट्याने फैलाव झाला आहे. एका आठवड्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली असून, मलेरियाचे ११८, डेंग्यूचे ५१ व गॅस्ट्रोचे ८३ नवीन रुग्ण आढळल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
पावसाळी आजारांचा फैलाव झपाट्याने होत असताना बाप्पाचे आगमन झाले आणि साथीच्या आजारांचा फैलाव कमी झाला होता; मात्र सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत यावर्षी पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी एक आणि डेंग्यू-स्वाइन फ्लूमुळे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमधील पावसाळी आजारांच्या स्थितीने पालिकेचे टेन्शन वाढले होते. ऑगस्टअखेरीस पुन्हा रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला; मात्र सप्टेंबरमध्ये पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पालिकेचे टेन्शन पुन्हा वाढले आहे.
पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा असे आजार, तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment